top of page

“बाण सुळक्या ” वरील री- बोल्टिंग यशस्वीरीत्या पूर्ण

दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था आणि सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्हचा (SCI) री-बोल्टिंग प्रकल्प

आडवाटेची भटकंती करणाऱ्यांसाठी सांधण दरी नेहमीच पसंतीस असलेले एक ठिकाण आहे. सांधण दरीजवळ बाण नावाचा एक नैसर्गिक बाणाच्या आकाराचा ७१० फुट ऊंच सुळका उभा आहे. हा सुळका पर्वतारोहणांमधील चित्तथरारक चढाई मार्गासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या अनेक सुळक्यांपैकी हा सर्वात कठीण चढाई मार्गांपैकी एक मानला जातो. अलीकडेच या चढाई मार्गाचे रिबोल्टिंग पूर्ण झाले आहे, अशी माहिती दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल पिसाळ आणि सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्हचे अध्यक्ष (SCI) डॉ.नरेंद्र पाटील यांनी दिली. या प्रकल्पाचे मोहीम नेते श्री. रमेश वैद्य आणि निहार सोले म्हणाले, "बाण सुळका री-बोल्टिंग प्रकल्प पुर्ण झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. सुरक्षित चढाईला प्रोत्साहन देणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. सर्व दुर्गप्रेमी गिरिभ्रण संस्थेच्या सभासदांच्या मदतीने आम्ही बाण सुळका री-बोल्टिंगचा हा कठीण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.” पुण्यातील दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था यांनी या प्रकल्पाचे प्रायोजक म्हणून पुढाकार घेतला आणि आवश्यक सर्व तांत्रिक सहाय्य सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह (SCI) ने खांद्यावर घेतले. दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेचे प्रकल्प नेते रमेश वैद्य आणि सेफ क्लायंबिंगचे निहार सोले यांच्या नेतृत्वात ११० सहभागींच्या मदतीने हा प्रकल्प दोन्ही संस्थांनी एकत्रित पूर्ण केला. प्रकल्प ५ जानेवारी ते १४ जानेवारी २०२० दरम्यान पूर्ण झाला. अहमदनगर जिल्ह्यातील सांधण दरी जवळच्या साम्रद गावाजवळ बाण सुळका आहे. पारंपारिक रिंग बोल्टवर अनेक गिर्यारोहक बाण सुळका चढाई करण्याचा प्रयत्न करत असतात. हे रिंग बोल्ट खुप जुने झाले होते आणि त्यावर गंज चढल्यामुळे त्यांची विश्वसनीयता कमी होऊन आरोहकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. सुळक्याच्या सभोवतालच्या दरीमुळे आणि अतिशय कठीण श्रेणीमुळे बाण सुळका चढाईचा प्रयत्न करणाऱ्या आरोहकांच्या सुरक्षेचा विचार करून जुने पारंपारिक बोल्ट बदलून नवीन महात्मा गांधी बोल्ट (एमजी बोल्ट) बसविण्याचे ठरले. तांत्रिक टिमचे नेते इंद्रनील खुरंगाळे आणि धनंजय सपकाळ म्हणाले, “बाण सुळका ज्येष्ठ गिर्यारोहक स्व. श्री. मिलिंद पाठक आणि त्यांच्या चमूने सर्वप्रथम १९८६ या साली सर केला. त्यानंतर श्री विवेक मराठे आणि त्यांच्या चमूने सन १९९१ साली तो पुन्हा एकदा अथक प्रयासाने सर करून दाखवला. ह्या प्रकल्पासाठी श्री विवेक मराठे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्री. मेहबूब मुजावर ह्यांनी ही ह्या मोहिमेला भेट देऊन त्यांचे अनुभव तांत्रिकटीम बरोबर शेअर केले. श्री. मेहबूब मुजावर व त्यांच्या टीम ने १९९२ साली बाण सुळका सर करण्याचा प्रयत्न केला होता पण ढीसूळ खडकामुळे अपघात होवून त्यांच्या टीम मोहीम अर्धवट सोडावी लागली. पाण्याचे दुर्भिक्ष्य, मधमाश्यांची मोठमोठी पोळी, अतिशय दुर्गम प्रदेश आणि त्यांत अत्यंत खडतर चढाई असल्यामुळे हा सुळका सर करणे हे गिर्यारोहकांसाठी एक मोठे आव्हान आहे. त्यातच जुने गंजलेले रिंग बोल्ट्स हे अत्यंत धोकादायक ठरू पाहत होते. या गंजलेल्या बोल्ट्स आणि तत्सम संरक्षण खिळ्यांच्या जागी या रिबोल्टिंग प्रकल्पात नवीन व्ही२ए स्टील चे बोल्ट बसवण्यात आले आहेत. नविन व्ही 2 ए स्टील बोल्ट गंजमुक्त आहेत. कमीतकमी ३००० किलो वजन पेलण्याची क्षमता आणि किमान ५० वर्षाचे आयुष्य हि त्याची वैशिष्ट्ये आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या तीन दिवसांत त्यांनी सुळक्याची काठीण्यपातळी, मार्गातील अडथळे आणि बदल नीट समजावून सांगितले. त्यांच्यासोबत सेफ क्लायम्बिंग इनिशिएटिव्ह चे संस्थापक सदस्य श्री. स्वानंद जोशी यांनी यु.आय.ए.ए. च्या मार्गदर्शक तत्वानुसार री-बोल्टिंग करताना, जुना मार्ग न बदलता तसेच त्याच्या नैसर्गिक काठीण्य पातळीत कुठलाही बदल होणार नाही याची काळजी घेत सुरक्षित रित्या री-बोल्टिंग करण्यास सांगितले. त्याचबरोबर श्री मेहबूब मुजावर ह्यांनी ही प्रकल्पाला भेट देऊन त्यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. हे रिबोल्टिंगचे काम अनुभवी तांत्रिक टीमने पुर्ण केले. या तांत्रिक टीम मध्ये तांत्रिक टीमच्या नेत्यांसोबत निलराज माने, नुवाजीश पटेल, अमोल रणदिवे, लहू उखाडे, गीतेश बांगरे, रोहण फंड, कृष्णा मरगळे, माकमोहन, कृष्णा बचुटे, युवराज किनिंगे, स्वप्नील गरड, तुषार खटयाळ, राहुल नेवाळे, निपुण शाह यांनी विशेष योगदान दिले. प्रकल्पाच्या संपूर्ण कालावधीत सेफ क्लायंबिंग इनिशिएटिव्ह चे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र शेळके आणि अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील ह्यांनी जातीने हजर राहून तांत्रिक टीमकडून यु.आय.ए.ए. च्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि सुरक्षित री-बोल्टिंग करून घेतले. हे करताना त्यांनी जुना मार्ग न बदलता त्याच्या नैसर्गिक काठीण्य पातळीत कुठलाही बदल होणार नाही याचीही काळजी घेतली. रमेश वैद्य (दुर्गाप्रेमी गिरिभ्रण संस्था) म्हणाले, दुर्गप्रेमी आणि सेफ क्लाईंबिग ईनिशीएटिव्ह या दोन्ही संस्थांनी ही ५ जानेवारी २०२० रोजी या मोहिमेला सुरुवात केली. पहिल्या दिवशी प्रकल्पातील सर्व सदस्य दुपारी अडीचच्या सुमारास साम्रद येथे पोहोचले. बेस कॅम्प साम्रद गावातून ६ कि.मी. अंतरावर टाकण्यात आला .बाणाच्या पायथ्याशी जाण्यासाठीची पायवाट डोंगराळ भागातून खडा चढ चढून व नंतर तीव्र उताराची होती . बाण सुळका बेस कॅम्पपासून सुमारे 2 तास अंतरावर होता. सर्व उपकरणे व साहित्य घेऊन जंगल आणि टेकडी चढून जात सर्व सभासद बेस कॅम्पवर पोहोचले आणि प्रकल्प शिबिरासाठी आणि इतर व्यवस्थेची व्यवस्था सुरू केली. बेस कॅम्प पासून हा भार वाहून नेणे खूप कठीण काम होते . म्हणून साहीत्याची ने-आण करण्यासाठी रतनगडाच्या घळीतील वाटेत एका ठिकाणी झिप लाईन टाकण्यात आली . दुसर्या दिवशी, तांत्रिक पथक सकाळी ८ वाजता बाण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. पुढील आठ दिवस तांत्रिक पथकाने क्लाइंबिंग मार्गावर री-बोल्टिंग पूर्ण केले. हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून संपूर्ण टिम १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ९:०० ला पुण्यात परतली. ठिसूळ दगड आणि झालेली झीज यामुळे हा प्रकल्प अंदाजानुसारच खूप कठीण होता.तो पूर्ण करण्यासाठी दुर्गाप्रेमी गिरीभ्रमण संस्था आणि सेफ क्लाईंबिग ईनिशीएटिव्ह च्या ११० लोकांच्या पथकाने हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. प्रोजेक्ट दरम्यान, बेस कॅम्पमधून तांत्रिक टीमला आवश्यक सहकार्य दिले गेले. अन्न, पाणी, ड्रील मशीन बॅटरी चार्ज करणे, तांत्रिक उपकरणे पुरविणे, निवास व्यवस्था या सर्व जबाबदाऱ्या दुर्गप्रेमी ने मजबूत संघांद्वारे खांद्यावर पेलल्या. गिर्यारोहण साहित्याची देखभाल गोपाल भंडारी आणि यश कैकाडे यांनी केली. जनरेटरची व्यवस्था दत्ता लोंढे, सुनिल काकडे व संतोष शेलार यांनी पहिली. परिवहनाची जबाबदारी अमोल मांगडे आणि समृद्धी शेळके यांनी निभावली तर अन्न बनवण्याची जबाबदारी रवींद्र , सुधिर घाटगे, धनंजय गुप्ता आणि किरण पवार यांनी लीलया पार केली. निवारऱ्याची धुरा अनिकेत बोकील आणि खुशी कंबोज यांच्याकडे होती. पाणी पुरवठा सचिन निगडे, सुरेश माने, स्नेहल घेराडे तसेच व्हिडिओ आणि छायाचित्रणाची धुरा समीर हजारे, ऋषिकेश चिंचोले आणि अमित वैद्य यांनी सांभाळली. वैद्यकीय जबाबदारी श्रीनाथ शिंदे आणि डॉ. प्रताप पठारे यांचेकडे होती. या कार्यक्रमाच्या कालावधीत सर्व सहभागींना विमा संरक्षण प्रदान केल्याबद्दल अॅडव्हेंचर स्पोर्ट्स कव्हर ३६० चे श्री. प्रतीक गुप्ता यांचे आभार मानू इच्छितो. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स कव्हर ३६० चे उद्दीष्ट हे सर्व वयोगटातील वेगवेगळ्या आर्थिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीवरील लोकांना भारत आणि परदेशात साहसी आणि क्रीडा विमा प्रदान करणे आहे. हे २०० अधिक साहसी क्रिडाप्रकार ज्यात हवा, पाणी आणि जमीन यावरील साहसी खेळांना लाभ देण्यासाठी केले गेले आहे. त्यांचे लक्ष्य सुरक्षित मैदानी अनुभवांना पाठिंबा देण्यासाठी आणि साहसी उत्साही लोकांना प्रोत्साहित करून जागरूक समुदाय तयार करणे आहे. श्री. विनोद कंबोज ह्यांचे मित्र आणि नितीन आणि कंपनी चे मालक श्री. नितीन ऐनापुरे सर ह्यांचे वायरलेस कॉमुनीकेशन मधे केलेल्या विशेष सहकार्याबद्दल मनापासून खूप आभार. ह्याशिवाय नोबेल हॉस्पीटल, सह्याद्री रोवर्स आणि सूर्याटेक सोलर्स ह्यांचे ही ह्या प्रकल्पाला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी विशेष योगदान लाभले. आम्ही त्यांचे ही आभार मानतो. प्रकल्पाच्या संपूर्ण कालावधीत अकोले मधील साबळे सर, साम्रद गावातील विनोद भवर ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्याशिवाय ऐनवेळेस बोल्टिंग साठी लागणाऱ्या केमिकल ट्युबस कमी पडल्याने अगदी कमी वेळात त्या ट्युबस नाशिक वरून साम्रद ला घेऊन येणारे नाशिक चे ट्रेकर श्री. सागर जोशी आणि विश्वनाथ मूर्ती ह्यांचे आम्ही खूप मनापासुन आभार मानतो. या बाण सुळका प्रकल्पाबद्दल अधिक तपशीलवार माहितीसाठी, कृपया संपर्क साधा: रमेश वैद्य - ९८६०७८१५८७ (मोहीम नेते, दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था) निहार सोले - ९८९०१५०८६५ (मोहीम नेते, सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह)


YouTube - https://youtu.be/OR93qTg2OII


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page