top of page
Search

भांबुरडे नवरा सुळका सर (200 फूट)

  • Durgpremi
  • Dec 1, 2019
  • 2 min read

दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेने शिवप्रतापदिनी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी मुळशी तालुक्यातील लोणावळ्या जवळील भांबुर्डे नवरा हा 200 फूट उंचीचा सुळका सर करून शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली.


घनगड ह्या परिसरात भटकंती करत असतांना भांबुर्डे नवरा हा सुळका गेल्या आठ दहावर्षात कोणी सर केला नाही अशी स्थानिकांकडून माहिती मिळाली. मग काय ? दुर्गप्रेमीच्या शिलेदारांनी हा सुळका सर करण्याचा निश्चय केला. संपूर्णपणे माहिती गोळा करून प्रस्तरारोहणसाठी लागणारे साहित्य याची यादी बनवून दुर्गप्रेमीचे 17 शिलेदार 8 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता भांबुर्डेगावात डेरेदाखल झाले लागलीच चारजणांच्या टीमने भांबुर्डे नवरी आणि नवरा सुळक्यामधील खिंडीत जाऊन चढाईच्या मार्गाची पाहणी केली आणि चढाईच्या मार्गावर साधारण सहाफुटावर पहिला बोल्ट हँडड्रिल हातोडीच्या साह्याने मारला.



अंधार झाल्यामुळे दुसऱ्या दिवसाचे नियोजन डोक्यात पक्के करून टीम बेसकॅम्पला गावात परतली. तोपर्यंत धनंजय गुप्ता आणि रवी गायकवाड यांनी इतरांच्या मदतीने सुग्रास जेवण तयार करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला पहाटे पाच वाजता उठून टीम प्रस्तरारोहणाचे सर्व साहित्य घेऊन सुळक्याकडे रवाना झाली. सहा वाजल्यापासून चढाईचा संघर्ष चालू झाला. चढाईचा या पूर्वीचा मार्ग पूर्णपणे ढासळून गेल्यामुळे नवीन मार्ग तयार करावा लागणार होता. सुळक्याचा दगड अत्यंत ठिसूळ आणि निसरडा झालेला असल्यामुळे चढाई अत्यंत अवघड झालेली होती.सुरुवात धनराजने केली. चिमणी प्रस्तरारोहण करण्याचा प्रयत्न होता. पण दगडाच्या बुकशेल्फ रचनेमुळे शक्य झाले नाही.त्यात प्रत्येक ठिकाणी हॅन्डड्रिल आणि हातोडीच्या साह्याने बोल्ट, पिटोन, मेखा माराव्या लागत असल्यामुळे शारीरिक क्षमतेची आणि मानसिक संयमाची कसोटी लागत होती. धनराज पिसाळ, धनंजय सपकाळ, सदगुरू काटकर व युवराज किनिंगे यांनी आलटून-पालटून प्रयत्न केले या सर्वांना शब्दशःइंच इंच जागा सरकावी लागत होती. जिथे एक पाय ठेवायला जागा नाही तिथे उभे राहून बोल्ट, पिटोन, चोक, फ्रेन्ड लावून/मारून मार्ग सुरक्षित करावा लागत होता. तीन बोल्ट, 2 पिटोन आणि तीन मेखा मारत मारतच सायंकाळ होण्यात आली तेव्हा चढाईच्या मार्गातील काठिण्य आणि सदस्यांचा शारीरिक थकवा ओळखून संस्थेचे अध्यक्ष सुनील पिसाळ यांनी बॅटरी ड्रिलमशीन मागवण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी रात्री पुण्यातून निघून दीपक झुरुंगे आणि अनिकेत बोकील लोणावळ्यातून बॅटरी ड्रिल घेऊन रात्री एक वाजेपर्यंत बेस कॅम्पला हजर झाले. आता शिवप्रतापदिन उजाडला होता ताज्या दमाच्या अनिकेत बोकील याने दिवसाची सुरुवात केली. बॅटरी ड्रिलच्या साह्याने त्याने लवकरच दोन बोल्ट आणि १ पिटोन मारून सुरुवात चांगली करून दिली.


धनराज व धनंजय यांनी निसरड्या आणि खड्या चढाईवर निसरडे गवत, ठिसूळ दगड आणि झाडे झुडुपे या सगळ्यांवर मात करत एक एक पाऊल सुरक्षित करीत दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुळका सर करून दुर्गप्रेमींचा झेंडा माथ्यावर रोवला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी भांबुर्डे परिसरातील आसमंत दणाणून सोडला. माथ्यावर २ मेखा आणि झाडाचा वापर करून स्टेशन बनवले. चढाईचा मार्ग सुरक्षित केल्यानंतर दुर्गप्रेमीच्या इतर शिलेदारांनी चढाईकरून सुळका सर केला. चढाईच्या मार्गात एकून ६ बोल्ट, चार ठिकाणी फ्रेन्ड, 2 पिटोंन, 5 मेखाचा वापर झाला. मोहिमेचे नेतृत्व धनंजय सपकाळ यांनी केले. टेक्निकल लीडर जबाबदारी धनराज पिसाळ यांनी पार पाडली. बिलेअरची जबाबदारी युवराज कीनींगे, सद्गुरु काटकर, अनिकेत बोकील, सुनील पिसाळ यांनी पार पाडली. मोहिमेत रवींद्र गायकवाड, रमेश वैद्य, ऋषिकेश चिंचोले, दत्ता लोंढे, तानाजी जाधव, संदीप जाधव, धनंजय गुप्ता, श्रीनाथ शिंदे, हेमंत रामटेके, राजेंद्र चव्हाण, सुनील काकडे, दीपक झुरुंगे आणि गणेश पठारे यांनी सहभाग घेतला.

Comments


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square

© 2015-2020 Durgpremi. All Rights Reserved.                                                                                                                                           Designed and Maintained by Sameer Hajare

bottom of page