top of page

ढाकची सून प्रस्तरारोहण मोहीम - २०१७ # Dhakchi Sun Climbing - 2017

वर्ष २०१७ उजाडले होते. दुर्गप्रेमीची वर्षातली पहिलीच मासिक सभा नेहमीप्रमाणे १५ तारखेला ठीक ७.०० वाजता सुरू झाली. वर्षातल्या प्रस्तरारोहणची सुरुवात एखाद्या आडवाटेच्या सुळक्याने करावी हे सर्वांचे मत पडले. दोन तीन पर्यायांवर खल झाल्यानंतर शेवटी ढाक ची सून ह्या सुळक्याला गवसणी घालावी हे ठरले.


लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाची किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमी जात असतात. मात्र याच राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्‍या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. किल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. तसेच ढाक किल्ल्याच्या पोटात ढाक भैरीची गुहा आहे. या गुहेत वर्षभर चांगलीच वर्दळ असते मग त्यात जुने जाणते गिर्यारोहक ही असतात व त्याच बरोबर हौशे-नवशे सुद्धा येतात. असो....!!! आतापर्यंत दुर्गप्रेमींच्या सदस्यांनी कित्येक वेळा ढाक भैरी गुहेला भेट दिली आहे तसेच टाक्या सफाई मोहीमही राबवली होती. तेव्हा प्रत्येक वेळी हा सुळका सर करावा अशी सुप्त इच्छा व्यक्त झाली कारण "कळकरायचा सुळका" सर करून भरपूर वर्ष लोटली होती. प्रस्तरारोहणचा निर्णय झाला व १२/०२/२०१७ आरोहणाची तारीख ठरली .


ठरल्याप्रमाणे १२ तारखेला पहाटे ४.३० वा ८ जणांच्या चमूने ढाकच्या दिशेने वाटचाल सुरू केली, पुणे~कामशेत~जंभिवली असा प्रवास करून पहाटे ६.०० वा चमू कोंडेश्वर मंदिरापाशी पोहचला. पुढील दहा मिनिटांमध्ये पूर्व तयारी करून कोंडेश्वर ते कळकराय खिंड असा प्रवास चमूने सुरु केला. या वाटेने दीड तासाचा प्रवास करून चमू काळकरायच्या खिंडीत येऊन पोहोचलो.


काळकराय सुळका व ढाक भैरीची गुहा यातील खिंडीत आल्यावर डावीकडे काळकराय सुळका, समोरून खिंड उतरून गेल्यास ढाक भैरीची गुहा तर उजव्याबाजूच्या कातळाला लागून असलेल्या आड वाटेने थोडे वर चढून गेल्यावर आपण ढाकची सून या सुळक्याच्या पायथ्याला येऊन पोहचतो. तिथून पुढे ती वाट ढाक किल्ल्यावर जाते. ढाकची सून या सुळक्याची उंची पायथ्यापासून सुमारे ७५ फुट आहे.


चमूने आप-आपल्या बॅग मधील प्रस्तरारोहणस लागणारे सर्व साहित्य काढून एकत्र केले. चढाईचे नेतृत्व युवराज किनिंगे हे करतील तर बिलेयरची जबाबदारी स्वप्निल गरड हे पार पडतील असे चमूने ठरविले. ढाक किल्ला व सुळका यातील खिंडीत नैसर्गिक बेस तयार करून सुरक्षिततेची खातीरजमा करून घेतली. श्री गणेशाचे वंदन करून युवराजने चढाईस सुरुवात केली. तीन मेखांचा वापरकरून दोर सुरक्षित करत युवराज आरोहण करत सुळक्याचा मध्यावर पोहचला.


पुढील आरोहणाच्या टप्प्यासाठी तीन फ्रेंडस व एक चोक नटचा वापर करून सुळक्याचा माथा गाठला. सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या चमूला ५२ मिनिटानंतर शिवाजी महाराजांच्या जय जय कराची घोषणा कानावर पडली व माथा सर झाला. सुळक्याचा माथा तसा खूप छोटा, माथ्यावर असलेल्या एका प्रसरणात्मक खिळ्या शेजारी १५" इंच अंतरावर एक मेख रोवून त्यात दोर सुरक्षित करून खाली सोडला. त्यानंतर उर्वरित सदस्यांनी माथा सर केला. दुर्गप्रेमीच्या शिरपेचात अजून एक तुरा रोवला गेला. साधारणतः दोन वाजण्याच्या सुमारास जेवनकरून सुळक्यापासून परतीचा प्रवास सुरु केला. पुण्यात सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चमू सुखरूप आप-आपल्या घरी पोहचला.


सूचना:-

1) प्रत्येक पावसाळ्यात प्रस्तारारोहनाच्या मार्गात थोडाफार बदल घडत असतो त्यामुळे वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त किमान अधिकचे साहित्य सोबत बाळगावे.

2) राहण्याचे व पिण्याच्या पाण्याचे एकमेव ठिकाण - ढाक भैरी गुहा.


मोहिमेतील सहभागी सदस्य -: गणेश पाठारे, रवींद्र गायकवाड, सुनील काकडे, संदीप जाधव, धीरज जाधव, धनंजय सपकाळ, स्वप्निल गरड, युवराज किनिंगे.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page