top of page

घनगड ते केवणी पठार - २०१६ (Ghangad)

पाऊस सुरु झाला कि वेध लागतात ते पावसाळी भटकंती व वर्षाविहाराचे. दरवर्षीं प्रमाणे यावर्षी हि संस्थेच्या मासिक सभेला पावसाळी भटकंतीचा विषय पटलावर आला. सभासदांनी काही ठिकाणे सुचवली. निवडक ठिकाणांची माहिती घेऊन त्यातील एका ठिकाणाची सर्वानुमते निवड करण्यात आली ते ठिकाण म्हणजे घनगड - केवणी - नाणदांड घाट - सुधागड पायथा - घनगड. भटंकतीसाठी तारीख ३० आणि ३१ जुलै व वेळ स. ७. ०० वा ठरली. मोहिमेसाठी सगळ्यांनी एकत्र भेटण्यासाठी सोपे व मध्यवर्ती ठिकाण म्हणून दत्तवाडी आशा हॉटेलची निवड झाली. भटकंतीसाठी येणाऱ्या सभासदांची माहिती घेण्यासाठी एका सभासदाची निवड झाली. भटकंतीचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अडसूळ तर नाव नोंदणीसाठी स्वप्नील गरड यांची निवड झाली.



सभासदांची यादी करून त्या सभासदांनी काय जिन्नस घ्यावयाचा आहे त्याची यादी दिली गेली. त्यात कांदा, बटाटा, तांदूळ, मिरची पासून ते निवाऱ्यासाठी ताडपत्री, पातेली, चमचे,पळी, औषधे व इतर बरेच काही. घनगडच्या पायथाला असलेल्या एकोले गावापर्यंत जाण्यासाठी चारचाकी घेऊन जायचे ठरले. काही अचानक काम आल्यामुळे सभासद कमी हि झाले. ३० जुलैला ठरल्या प्रमाणे सगळे सभासद दत्तवाडीला पोहचले. प्रत्येक गाडीत चार असे चार गाड्यात सोळा जण भटकंतीसाठी निघाले. सगळ्या गाडयांनी घनगडच्या मार्गानी कूच केली. पुणे - ताम्हिणी - वांद्रे - भांबुर्डे - एकोले असा प्रवास करत दु १. १० ला घनगड पायथ्याला एकोले गावी पोहचलो. वेधशाळेने दिलेल्या अंदाज प्रमाणे पुण्यात थोडा बहुत तर ताम्हिणी घाट ते एकोले तुफान पाऊस कोसळत होता. एकोले गावात वाहने लावून शेजारी असलेल्या मारुती मंदिरात सगळे जमले. गावातील एका घरात सगळ्यांसाठी चहा बनवण्यास सांगितले कारण धोधो कोसळणाऱ्या पाऊसाने सगळे गारठले होते. सगळ्यांनी आपापल्या बॅग व त्यातील जिन्नस भिजणार नाही याची खात्री करून घेतली.



दुपारी १. ३० ला घनगडच्या मागील बाजूस असलेल्या केवणी पठाराकडे कूच केली. गावातून साधारणपणे १ किमी. अंतर चालल्यानंतर एक छोटे खाणी मंदिर लागते. त्या मंदिरापासून अंदाजे ८०० ते ९०० मीटरवर आपण केवणी व घनगड याच्या घाटवजा खिंडीत येऊन पोहचतो. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खिंडीतील वाट बिकट व निसरडी झाली होती. त्या खिंडीतून उतरत असताना तेथून दिसणारा कोकण व देशावरील तेलबैला डोंगर मन मोहून टाकत होता. खिंडीपासून आपण सुधागड तालुक्यात प्रवेश करतो. निसर्गाचे हे मोहक दृश्य छायाचित्रात व मनात साठवत सभासदांनी एकमेकांना सावरत केवणीची खिंडची चढाई सुरु केली. चढाई संपल्यावर आपण केवणीच्या विस्तीर्ण अश्या पठारावर येऊन पोहचतो. पठारावर पावसाने थोडी उघडीप दिली होती दुपारचे २. ३० वा होते त्याचाच फायदा करत पठारावर जेवायचे ठरले. प्रत्येक सभासदाने एकवेळचे जेवण आणले होते. जेवण करून पुन्हा केवणी गावाकडे सगळे निघाले. खिंडीपासून अंदाजे १ किमी. अंतरावर आपण केवणी गावात पोहचतो. गावात दोन चार घरा शिवाय एक पडकी व जीर्ण अवस्थेतील शाळा दिसते.


केवणी गाव मागे टाकत आम्ही नाणदांड घाटाकडे निघालो त्यात पाऊस व धुक्याचा लपंडाव चालूच होता. केवणी पासून अंदाजे ८०० ते ९०० मीटर पुढे आल्यावर आपण नाणदांड घाटाच्या तोंडावर पोहचतो. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता, वेळ सुद्धा ४. ३० ची झाली होती, त्यातून पावसामुळे सात ते आठ फुटावरचे सुद्धा दिसणे अवघड झाले होते. सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून घाट न उतरता तेथेच वस्ती करण्याचा निर्णय झाला. सुनील पिसाळ, गणेश पाठारे, समीर हजारे व प्रशांत अडसूळ यांनी वस्तीसाठी जागा निवडली. समीर, प्रशांत, सुयश, गणेश व संदीप यांनी तंबू उभारणीस सुरवात केली. त्याच बरोबर सुनील काकडे, धनंजय गुप्ता, रवींद्र आणि रमेश वैद्य यांनी चूल पेटवयास घेतली कारण धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे चूल लवकर पेटणार नाही याची कल्पना आलीच होती. राजेंद्र, युवराज, धनंजय सपकाळ यांनी चुलीसाठी जळण गोळा करायला सुरवात केली. सुनील पिसाळ, स्वप्नील, मंदार व श्रीनाथ शिंदे यांनी वस्तीची जागा साफ करून स्वयंपाकला लागणाऱ्या पाण्याची सोय केली. तंबू तयार झाल्यावर स्वयंपाक बनवण्यासाठी रवींद्र गायकवाड, धनंजय गुप्ता व मंदार जोशी यांनी सूत्रे हातात घेतली. रात्री ९. ३० च्या आसपास सभासदांनी जेवायची तयारी सुरु केली. जेवण होताहोता १० वाजून १५ मिनिट झाले होते. झोपायची तयारी करून सभासद एकमेकांशी गप्पा मारत झोपी गेले. रात्रभर पाऊस मनसोक्त बरसत होता. पहाटे ४. ३० वाजता पावसाचा जोर जास्तच वाढला.


सकाळी ७. ०० ला सभासदांनी उठून आपआपली कामे करून तयार झाले. एकाबाजूला रमेश वैद्य यांनी चहा बनवण्यास घेतला. बाकीच्या सभासदांनी रात्रीच्या उरलेल्या भात व भाजीवर ताव मारला. नाश्ता झाल्यावर सगळ्यांनी बॅग भरून तंबू काढण्यास घेतला. बाकीच्या सभासदांनी आजूबाजूस झालेला कचरा एका पिशवी मध्ये भरून परतीच्या प्रवासासाठी तयार झाले. १०. ४५ ला केवणी ते एकोले सभासदांनी परतीचा प्रवास चालू केला. दुसऱ्या दिवशी ही पावसाने चांगले झोडपून काढले. दुपारी २. १० ला एकोले गावात पोहचून सभासदांनी एकोले ते पुणे असा परतीचा प्रवास सुरु केला. सायंकाळी ७. ०० च्या सुमारास सर्व सभासद आपआपल्या घरी सुखरूप पोहचले.


भटकंतीतील सहभागी सभासद : सुनील पिसाळ, प्रशांत अडसूळ, रमेश वैद्य, रवींद्र गायकवाड, गणेश पाठारे, समीर हजारे, धनंजय गुप्ता, संदीप जाधव, सुनील काकडे, राजेंद्र चव्हाण, धनंजय सपकाळ, सुयश लोयरे, स्वप्नील गरड, मंदार जोशी, युवराज किनिंगे, श्रीनाथ शिंदे.




जवळपासचा परिसर : घनगड, तेलबैला डोंगर, सुधागड, मुळशी जलाशय, लोणावळा - कोरीगड, नागफणी.





Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page