top of page

दुर्ग लिंगाण्यावरील प्राचीन गुहेचा शोध - 2014 (Lingana)


लिंगाणा हा दुर्ग महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर आहे. उंची ३००० फूट तर श्रेणी अत्यंत कठीण असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड दरम्यान आहे. लिंगाण्याचा कातळ हा २९६९ फूट असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. रायगड जर राजगृह तर लिंगाणा कारागृह होते. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी यासाठी अतिशय अनुकूल आहेत. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय होता. गडावरचे दोर आणि शिड्या काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद होत असत.

लिंगाण्यावरील गुहा प्रशस्त असून ३० ते ४० माणसे राहू शकतात. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्वर आपल्याला दर्शन देऊन तृप्त करतो. या गुहेवरून पुढे आपण गेलो की, आपण एका कोरड्या हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायर्‍या आहेत, ज्या वरती असलेल्या गुहांपर्यंत जातात. इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं, जे अजूनही शाबूत आहे. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे.

लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका आहे. यावर जायचे म्हणजे वाट पूर्णत: घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३ ते ४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे, मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आगळाच आनंद मिळतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी दिनांक १३ डिसेंबर रोजी सर्व सभासद पुणे-भोर-वरंधा-बिरवाडी मार्गे दुर्ग लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेल्या पानेगाव येथे रात्री ९.१५ च्या सुमारास मुक्कामी पोहचले. पानेगावपासून लिंगाणा माचीचे(बेस कॅम्प) अंतर साधारणतः २ किमी आहे. लिंगाणा माची ते पूवेकडील खडकातील खोदीव गुहेपर्यंत चढाई करण्यास साधारणतः दीड तासाचा अवधी लागतो. पूर्वेला असणाऱ्या या गुहेपासून लिंगाणा शिखरपर्यंतची चढाई अतिशय कठीण आहे. पानेगावपासून लिंगाणा माची पर्यंत पोहचण्यासाठी जंगल व अवघड चढाची पायवाट चढून येण्यास साधारणतः पाऊणतास लागतो.

अश्या मोहिमेसाठी लागणारे टेक्निकल साहित्य,राहायचे तंबू, जेवण व्यवस्थेकरिता लागणारे साहित्य अशी सर्व साधनसामुग्री घेऊन लिंगाणा माची गाठणे हे एक दिव्यच होते. पानेगावात पोहचल्यानंतर पोटाची आग (भोजन करून) शांत करून रात्री ११ वाजता प्रस्थान केले. अवघड वाटेवरून पायपीट करून सर्व अवजड साधनसामुग्री घेऊन पहाटे २ वाजता लिंगाणा माचीवर पोहचलो. तेथे पोहचून तंबू उभारणे व अन्य व्यवस्थेला सुरवात झाली. हे सर्व करत असताना पहाटेचे ४ कधी वाजले ते कळलेच नाही. सर्व मंडळी दमलेली असल्याने सगळेच निद्रेच्या अधीन गेले.

सकाळी उठल्यावर व्यक्तिगत कामे आवरल्या नंतर लिंगाणा माचीवरील जणांनी देवीची मंदिरात पूजाकरून मोहिमेस सुरवात केली. सकाळी १०.०० वाजता टेक्निकल टीमच्या ८ सभासदांनी आवश्यक ते प्रस्तारोहणाचे साहित्य बरोबर घेऊन लिंगाण्याच्या पश्चिम मार्गाने चढाईस सुरवात केली. पश्चिमेकडील धारेवरती पोहचल्यानंतर गुहेतील शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन कड्यालगत मार्गाने दक्षिणेस कूच केली. या मार्गाने आपण लिंगाण्याच्या दक्षिनेकडील कातळाला वळसा घालून रायलिंग पठारासमोरील गुहेपाशी पोहचतो. गुहेत वस्ती करून सूर्यास्तापर्यंत लिंगाणा शिखर सर करून वाटेतील सर्व दोर व्यवस्थित लावून सायंकाळी ६.१५ वाजता वस्तीची जागा गाठली. लवकर जेवण करून चमू झोपी गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी माथा गाठून दक्षिणेकडील बाजूस दोर सोडून संभाव्य असणाऱ्या गुहा शोधण्याचा प्रयन्त सुरु केला.

दक्षिण बाजूस शिखरपासून खाली ५० फूट अंतरावर दोन पाण्याचे हौद व एक गुहा निदर्शनास आली. अंधार पडल्यामुळे दिवसाची शोध मोहीम थांबवावी लागली. चौथ्या दिवशी दक्षिणेकडील उरलेल्या भागात शोधमोहीम करायची होती, परंतु प्रचंड सुटलेल्या वाऱ्यामुळे तिथे काम करणे अश्यक्य झाले होते. तो बेत रद्द करावा लागला. रायलिंग पठारावरील छायाचित्रण करणाऱ्या टीमने लिंगाणा मोहिमेच्या पूर्वतयारी दरम्यान उत्तर दिशेच्या कातळात गुहा सदृश्य ठिकाण पहिले होते. दक्षिण दिशेच्या तुलनेने उत्तर दिशेस वारा कमी असल्याने टेक्निकल टीमने उत्तर भागात शोध मोहीम सुरु केली.

लिंगाण्याच्या पूर्वेकडील हत्ती खडकापासून एक पदर खाली उतरून पूर्वेकडून पश्चिमेस शोधमोहीम सुरु केली, मेखा, कारवी यांच्या साहाय्याने दोर अडकवत, माती, गवत व कातळाचा आधार घेत हळूहळू पुढे सरकू लागली. अंदाजे ९७ मीटर अंतर पश्चिमेकडे सरकल्या नंतर ७ फूट उंचीवर कातळ खडकात खोदलेली गुहा नजरेस पडली. सदर गुहेची लांबी ७ फूट ९ इंच, रुंदी ७ फूट ५ इंच तर उंची ३ फूट ७ इंच आहे. हि गुहा पूर्णपणे खडकात कोरलेली असून तिचा दरवाजा उत्तरमुखी असून त्याची रुंदी ५ फूट तर उंची ३ फूट ७ इंच आहे.

सदर गुहेतून उत्तरेकडे पाहिले असता समोर गायनाळ व निसणीची नाळ स्पष्ट दिसते. सदर गुहेचा वापर पूर्वी पहाऱ्याची चौकी म्हणून होत असावा असे भैगोलिक रचणे वरून दिसते. त्यानंतर टेक्निकल टीमने सायंकाळी माथ्यावरून पश्चिम बाजूच्या कड्यावरून दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करून खाली पश्चिमेकडील कड्यावरील असणाऱ्या दोन धान्य कोठार व पाण्याच्या टाक्याचे मोजमाप घेतले व तिथून खाली उतरून पश्चिम धारेवरून लिगांणा माचीकडे कूच केली.

मोहिमेच्या ठरलेल्या अंदाजापेक्षा कैक पटीने हे काम अवघड होते परंतु सर्व अडचणीवर मात करत हि मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण आली. अशी आगळीवेगळी मोहीम पूर्ण करण्यासाठी दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेचे ३३ सभासद ५ दिवस सतत राबत होते. हि मोहीम राबवताना टेक्निकल टीमला लागणारी मदत बेस कॅम्प अर्थात लिंगाणा माचीवरून पुरवली जात होती. वाहतूक व्यवस्था करणे, ड्रील मशीन बॅटरी चार्ज करून पुरवणे इत्यादी कामासाठी अगोदरच पथकं ठरली होती. यामध्ये टेक्निकल साहित्य व्यवस्था - सुनील काकडे, वाहतूक व्यवस्था - सचिन निगडे, जेवणाची व्यवस्था - धनंजय गुप्ता, तंबू उभारणी व राहण्याची व्यवस्था - ऋषिकेश चिंचोले, पाणी व्यवस्था - सागर गिरमे, छायाचित्रण व्यवस्था - विशाल फरांदे व समीर हजारे, तसेच वैद्यकीय व्यवस्था - प्रशांत अडसूळ प्रमुखांनी त्यांचा टीम सोबत पार पडली.

Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page