top of page

भैरवगड (मोरोशी) कातळभिंत प्रस्तरारोहण मार्ग सुरक्षित (Bhairavgad Moroshi) - 2012

गिर्यारोहक आणि ट्रेकर्सना नेहमीच खुणावत असणारा भैरवगड (मोरोशी) किल्ल्यावरील पारंपारिक चढाई मार्ग व क्लायम्बिंग रुट री-बोल्टींग करून सुरक्षित करण्यात आला आहे. री-बोल्टींगचा हा उपक्रम दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था व सेफ क्लायम्बिंग इनिशिएटीव्ह (SCI) संस्था पुणे यांच्याकडून संयुक्तपणे प्रशांत अडसूळ आणि प्राजक्ता घोडे यांच्या नेतृत्वाखाली २८ नोव्हेंबर २०१२ ते ३ डिसेंबर २०१२ यादरम्यान पूर्ण करण्यात आला. या प्रोजेक्टमध्ये ११५ उत्साही स्वयंसेवक सहभागी झाले होते. या प्रोजेक्टचे प्रायोजकत्व दुर्गप्रेमी संस्थेने स्वीकारले होते, तर मोहीम पूर्ण करण्यासाठी संपूर्ण टेक्निकल सहकार्य सेफ क्लायम्बिंग इनिशिएटीव्ह (SCI) या संस्थेने केले.



ठाणे जिल्ह्यात माळशेज घाट उतरल्यावर मोरोशी गावच्या दक्षिणेस भैरवगडाची अजस्त्र भिंत दिसते. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत अशा भिंतीना डाईक असे संबोधतात. पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या या भिंतीची उंची सुमारे ४५० फुट आहे. हि अजस्त्र भिंतच भैरवगड म्हणून ओळखला जातो. पूर्व दिशेने खिंडीतील बाजूने या किल्ल्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा एकच पारंपारिक मार्ग आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी या पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. जवळपास ८० अंशाची उभी चढाई आणि तुटलेल्या पायऱ्यांमुळे किल्ल्यावर जाणारी हि वाट अतिशय धोकादायक झालेली आहे. तसेच या किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या कातळभिंतीवर क्लायम्बिंग रुट आहे. या रुटवरून सुमारे २० वर्षापूर्वी क्लायम्बिंग करण्यात आलेलं होत. क्लाइम्ब करताना त्यावेळेस पारंपारिक रिंग बोल्ट वापरून क्लायम्बिंग केलं गेलं होतं, मात्र ते रिंग बोल्ट कालांतराने गंजून जुने झाल्याने चढाईची हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला होता. समोर खोल दरी आणि अत्यंत कठीण श्रेणीचा क्लायम्बिंग रुट यामुळे येथे क्लाइम्ब करणाऱ्या गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी नवीन बोल्टींग करणे गरजेचे होते आणि त्यादृष्टीने पूर्वी ठोकण्यात आलेल्या जुन्या लोखंडी रिंग बोल्टच्या जागी नवीन महात्मा गांधी बोल्ट (MGB बोल्ट ) बसवण्यात आलेले आहेत.


टेक्निकल टीमचे लीडर सुनील पिसाळ व वर्षा शेळकंदे यांनी सांगितले कि, “या प्रोजेक्टदरम्यान एकूण १०९ नवीन बोल्ट ठोकण्यात आले. त्यामध्ये पाण्याच्या टाक्यांपासून पूर्वेकडच्या खिंडीपर्यंत जाणऱ्या ट्रॅव्हर्सवर १० तर खिंडीतील पारंपारिक रुटवर १९ बोल्ट मारण्यात आले. तसेच पाण्याच्या टाक्यांपासून पश्चिम दिशेच्या कड्यावरील क्लायम्बिंग रुटपर्यंतच्या ट्रॅव्हर्सवर १५ तर क्लायम्बिंग रुटवर ६३ बोल्ट वापरावे लागले. आणि पाण्याच्या टाकीजवळदेखील २ बोल्ट मारण्यात आले. या ठिकाणी क्लायम्बिंग रुटवर री-बोल्टींग करत असताना कातळभिंतीच्या रुटची काठीण्य पातळी शाबूत ठेवण्यात आलेली आहे. रुट सुरक्षित करण्यासाठी वापरलेले नवीन बोल्ट “व्ही टू ए” या विशेष प्रकारच्या स्टीलपासून तयार केलेले आहेत आणि या नवीन बोल्टची क्षमता कमीतकमी तीन हजार किलोची असून हे बोल्ट पुढील पन्नास वर्षे टिकून राहतील. बॅटरीवर चालणाऱ्या ड्रिलींग मशिनच्या सहाय्याने कातळाला नऊ सेंटीमिटर लांबीचे आणि अठरा मिलीमीटर व्यासाचे छिद्र पडून त्यात विशिष्ट रासायनिक द्रव्य सोडून बोल्ट ठोकण्यात येते.



२८ नोव्हेंबर रोजी दुर्गप्रेमी आणि SCI या दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी मिळून या उपक्रमाला सुरवात केली. प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी सर्व सहभागी सभासद संपूर्ण तयारीनिशी दुपारी १२.४५ च्या सुमारास भैरवगडच्या पायथ्याशी असलेल्या मोरोशी गावात पोचले. मोरोशी गावापासून बेस कॅम्प जवळपास तीन किलोमीटर अंतरावर असून बेस कॅम्प पासून भैरवगड कातळभिंत २० मिनिटांच्या अंतरावर आहे. गावापासून बेस कॅम्पपर्यंत पोहचण्यासाठी जंगल व अवघड चढणावरची पायवाट आहे. अशा अवघड वाटेवरून प्रोजेक्टसाठी लागणारे टेक्निकल साहित्य, जनरेटर, राहण्यासाठी लागनारे तंबू, जेवणाच्या व्यवस्थेसाठी लागणारे साहित्य, अशी सर्व साधनसामग्री घेऊन बेसकॅम्पवर पोहचणे दिव्यच होते. या अवघड पायवाटेवरून पायपीट करीत सर्वजण सर्व साधनसामग्री घेऊन बेसकॅम्पला पोहचले. तेथे पोहचून तंबू उभारणे आणि अन्य व्यवस्थेला सुरवात झाली. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी टेक्निकल टीम सकाळी ८.०० वाजता कातळभिंतीच्या पायथ्यास पोहचले तेथे पूजा करून बोल्ट मारण्यास सुरवात झाली. त्यानंतर टेक्निकल टीमने पुढील चार दिवसात पूर्वेकडच्या खिंडीतील पारंपारिक मार्ग, खिंडीपासून पश्चिम दिशेच्या कड्यावरील क्लायम्बिंग रुटपर्यंतच्या ट्रॅव्हर्सवर आणि पश्चिम दिशेच्या कड्यावरील क्लायम्बिंग रुटवरील री-बोल्टींग पूर्ण करून सर्वजन सहाव्या दिवशी पुण्यात परतले. री-बोल्टींग प्रोजेक्टसाठी जे काही अंदाज पूर्वी ठरवलेले होते, त्यापेक्षा कैक पटीने हे काम अवघड होते, परंतु तरीही सर्व अडचणींवर मत करत हा प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.



असा हा आगळा वेगळा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी दुर्गप्रेमी आणि SCI एकूण ११५ सदस्य ६ दिवस सतत राबत होते. हा उपक्रम राबविताना टेक्निकल पथकाला लागणारी मदत बेस कॅम्प वरून पुरविली जात होती. जसे वाहतूक व्यवस्था, करणे, ड्रिल मशिनच्या चार्ज केलेल्या बॅटरीज पुरविणे, पुरविणे, इ. कामासाठी अगोदरच पथकं नेमली होती आणि या पथक प्रमुखांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. यामध्ये टेक्निकल साहित्यांची व्यवस्था ऋषिकेश जवळकर व शिल्पा जोशी, जनरेटरची व्यवस्था दत्तात्रय लोंढे व आदिनाथ बोराटे, वाहतूक व्यवस्था रवींद्र गायकवाड व गणेश रासने, जेवणा-खाण्याची व्यवस्था सुधीर घाडगे व रुपाली चव्हाण, तंबू उभारणी आणि राहण्याची व्यवस्था तानाजी भोसले व रितेश इंगळेश्वर, पाण्याची व्यवस्था सुनील काकडे व अतुल मोरे, छायाचित्रणाची व्यवस्था विशाल फरांदे व दिनेश शिंदे, वैध्यकीय व्यवस्था डॉ. भूषण दांडे व गोपाल भंडारी, तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून समीर हजारे व सुनील पाटील या प्रमुखांनी त्यांच्या टीम्ससोबत पार पडली, तर रमेश वैद्य हे या सर्व टीम्सचे देखरेख करीत होते.



एक महत्वाचा उल्लेख आवर्जून करवास वाटतो कि, अलाइड पेटझेल यांनी या प्रोजेक्टच्या टेक्निकल साहित्यांसाठी सहकार्य केले, बी. जे. मेडिकल माऊंटेनिअरिंग अकादमी यांनी या प्रोजेक्टसाठी वैध्यकीय व्यवस्था पुरविली होती तर श्री. किशोरभाऊ धायरकर (मुंढवा) यांनी आपत्कालीन व्यवस्था म्हणून प्रोजेक्टच्या सहा दिवसांच्या कालावधीसाठी अम्बुलन्सची सेवा आणि हर्षद भावसार यांनी जनरेटरची व्यवस्था विनामूल्य केली होती.


सेफ क्लायम्बिंग इनिशिएटीव्ह (SCI) संस्थेविषयी:


साधारण आठ वर्षापूर्वी जर्मनीचे प्रसिद्ध गिर्यारोहक आणि प्रस्तरारोहक निकोलस मायलँडर भारतात योगा शिकण्यासाठी आले असता, पुण्यात त्यांना सह्याद्रीतील प्रस्तारांची माहिती समजली. त्यांनी सह्याद्रीतील अनेक कड्यांची आणि सुळक्यांची पाहणी केली. तेंव्हा त्यांना भारतातील प्रस्तरारोहक अत्यंत जोखीम घेऊन प्रस्तरारोहण करतात हे प्रामुख्याने त्यांच्या लक्षात आले. सह्याद्रीत प्रस्तरारोहण करण्यासाठी जे बोल्ट वापरले आहेत ते आंतरराष्ट्रीय निकषानुसार नसून त्यांना त्यांची स्थिती अत्यंत दयनीय दिसली. त्यानंतर पुण्याच्या प्रस्तारोहाकांना ते भेटले आणि याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. अनेक भेटीनंतर आणि चर्चेनंतर कडे आणि सुळक्यांचे क्लायम्बिंग रुट सुरक्षित करण्यासाठी सेफ क्लायम्बिंग इनिशिएटीव्ह (SCI) या संस्थेची स्थापना करण्यात आली. SCI च्या स्थापनेनंतर री-बोल्टींगचा पहिला प्रोजेक्ट “ड्युक्स् नोज् (नागफणी)” हा होता. या प्रोजेक्टसाठी वापरण्यात आलेले बोल्ट हे जर्मनीत बनवले होते आणि याचा सर्व खर्च निकोलस मायलँडर यांनी स्वतः सोसला होता शिवाय त्यांनी SCI संस्थेला बॅटरीवर चालणारी ड्रिल मशिनदेखील उपलब्ध करून दिली होती.


तथापि प्रत्येक वेळी जर्मनीत बोल्ट तयार करणे अथवा आयात करणे आर्थिकदृष्ट्या SCI च्या आवाक्यातील नव्हते, म्हणून निकोलस मायलँडर यांनी “व्ही टू ए” या स्टीलचे बोल्ट तयार करण्याचे प्रशिक्षण व बोल्टला बाक देण्यासाठी आवश्यक मशीनसुद्धा दिले. अशा पद्धतीने पुण्यात विजय लिमये यांच्या अमूल्य सहकार्याने भारतीय बनावटीचे बोल्ट तयार करण्यात आले. तथापि सदर बोल्टचे परीक्षण आवश्यक होते. सदर बोल्ट आंतरराष्ट्रीय दर्जा तपासण्यासाठी जर्मनीला पाठवण्यात आले. SCI ने बनविलेले बोल्ट किमान ३००० किलोचा बोजा पेलू शकतात, त्यांचे आयुष्य किमान ५० वर्षे आहे व ते भारतीय हवामानुसार अत्यंत योग्य दर्जाचे आहेत असे या तपासणीअंती सिद्ध झाले.


SCI संस्थेचा सह्याद्री पर्वतरांगा आणि तसेच संपूर्ण भारतभर असे प्रोजेक्टस् राबविण्याचा मानस आहे. कोणतीही संस्था अथवा ग्रुपने पुढाकार घेऊन SCI संस्थेला याकामी सहकार्य करू शकतात. बोल्टस्, रासायनिक ट्यूब्ज्, बॅटरीवर चालणारी ड्रिलींग मशिन व अन्य टेक्निकल साधने SCI कडून उपलब्ध करून दिली जातात. तसेच प्रोजेक्टच्या काळात बोल्टस् बसविण्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाते. सहकार्य करणाऱ्या संस्थेने मनुष्यबळ, खाद्य, वाहतूक, छायाचित्रण, चलचित्रण, वार्ता माध्यमे इ. ची सोय करणे अपेक्षित असते. सदर प्रोजेक्टचे सर्व श्रेय प्रायोजक संस्थेस दिले जाते. सुरक्षिततेची जाणीव जास्तीत जास्त प्रस्तारारोहकांपर्यंत पोहाविण्याचा हेतू SCI संस्थेने गृहीत धरलेला आहे. SCI संस्थेने आजवर ढाकचा बहिरी सुळका, नागफणी कडा, तैलबैला कातळभिंत, वानरलिंगी सुळका, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, नानाचा अंगठा तसेच नाशिक जिल्ह्यातील पहिने नवरा, पहिने नवरी, संडे वन व अंजनेरी नवरा या ठिकाणी अन्य प्रायोजक संस्थांच्या सहाय्याने अशा प्रकारचे बोल्ट बसवून तेथील क्लायम्बिंग रुट सुरक्षित केले आहे.


अधिक माहितीसाठी - www.sciindia.org


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page